Girish Bapat : सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी सुरु आहेत. प्रत्येक पक्ष आपली पक्षसंघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी वाटेल ते प्रयत्नही करत आहेत. यासोबतच एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे भाजप आणि शिवसेनेतील वादही दिवसेंदिवस वाढत आहे.
या सर्व प्रकरणावर पुणे येथील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व घडामोडींवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गिरीश बापट यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते गिरीश बापट म्हणाले की, सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपही सत्तेची गणिते जुळवित असल्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढेच ध्येय कार्यकर्त्यांचे राहिले आहे. राजकारणात गोर गरीब लोकांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पाहणे महत्त्वाचे असते. परंतु, आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढही लागली आहे.
तसेच कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष उभा कसा राहिल? मात्र, आता हेच कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालाव्या लागतात. त्यामुळे राजकारणाचा स्तर खालावला आहे. कार्यकर्त्यांकडे वैचारिक बांधिलकी नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यातच कार्यकर्त्यांना धन्यता वाटते. या सर्व गोष्टी माझ्यासारख्याला पटत नाहीत. त्यामुळे मी सर्वच पक्षांवर नाराज आहे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना बापट म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल्याशिवाय त्याला कोणतेच पद देऊ नये. सर्वच पक्षांनी असे केले तर राजकारणातील स्तर टिकून राहू शकेल. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी आता दारूड्यालाही जवळ केले जाते. हे सगळं माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. त्याबाबत कोणीतरी बोलणे गरजेचे आहे.
भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही तो निवडून येऊ शकतो, हे सगळं लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत. पूर्वी निवडणुकीतील अनामत रक्कमही जप्त झाली तरी चालत होते. परंतु, आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जात आहे. हा सर्व प्रकार व्यथित करणारा आहे, अशी खंत गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल
मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“तू ठाकरे है, तो मैं भी….”, नवनीत राणा पुन्हा उद्धव ठाकरेंवर बरसल्या, वाचा नेमकं काय म्हंटलंय?