Shirur : महाराष्ट्रामध्ये उद्योग, रोजगार वाढवण्यात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील गावगाडा सहकाराच्या मदतीने चांगल्या आर्थिक स्थितीत जाऊन पोहोचला आहे. सहकारी तत्त्वाचा साखर कारखाना असो, दूध उत्पादक संघ असो अथवा अन्य संस्था यामध्ये आता मोठा गोंधळ, वादावादी वार्षिक सर्वसाधारण सभेला होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
शिरूरमध्ये रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये साखर कारखान्याचे संचालक राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांना सभासदांच्या, विरोधकांच्या मोठ्या रोषाला यावेळी सामोरे जावे लागले. त्यांनी या सगळ्या गोंधळात आपले भाषण आटोपते घेतले आणि सभेतून पळ काढला.
व्यवस्थापकीय उपसंचालकांनी सभेचा अजेंडा वाचून दाखवला. त्यानंतर कारखान्याचे संचालक अशोक पवारांनी भाषण करण्यास सुरुवात केली. मात्र याचवेळी सभासदांकडून, विरोधकांकडून प्रश्न विचारण्याची मागणी होऊ लागली. मात्र संचालकांनी आपले भाषण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सभेमध्ये एकच गोंधळ माजला आणि कोणत्याही चर्चेशिवाय राष्ट्रगीत होऊन सभा संपली.
कारखान्याचा तोटा २१ कोटींवर गेला आहे. कारखान्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस असून गाळप दिवसेंदिवस कमी होत आहे. चांगल्या स्थितीत असलेला साखर कारखाना पवारांच्या स्वार्थामुळे अडचणीत सापडला आहे. कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. शेतकऱ्यांना लवकर पैसे दिले जात नाहीत. या सर्व प्रश्नांबाबत आम्ही सर्वसाधारण सभेत जाब विचारणार होतो. मात्र संचालकांनी आम्हाला ती संधीच दिली नाही, असे कारखान्याचे सभासद सदस्य पलांडे यांनी सांगितले.
या सभेत संचालकांनी भाषण करताना एफआरपीबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार न आल्यामुळे आभार मानले. पुढे ते म्हणाले, इतर कारखान्यांच्या तुलनेत बॉयलर कमी असल्यामुळे सहवीज निर्मिती कमी प्रमाणात झाली. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वीज निर्मिती करूनही पैसे मिळाले नाही. के-जनमुळे १६ कोटींचा तोटा कारखान्याला झाला. आजी-माजी संचालक करत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा यावेळी पवार यांनी केला.
मागील काही दिवसांपूर्वी अशोक पवारांनी वीज खरेदी करार न होण्यास, कारखान्यावरील बोजा वाढण्यास भाजप जबाबदार असल्याची टीका केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, खुल्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. ऑनलाईन प्रक्रिया असून सुद्धा त्या ठिकाणी रावसाहेब पवार घोडगंगा कारखान्याचे प्रतिनिधी आले नाहीत. ही त्यांची चूक आहे, आमची नाही.’
महत्वाच्या बातम्या-
Jasprit Bumrah: बुमराहच्या जागी ‘या’ घातक खेळाडूला मिळाली संधी, वेगवान गोलंदाजीने विरोधकांना फोडणार घाम
Grandmother: आजीचे टॅलेंट पाहून नातीला सुचली भन्नाट आयडिया, ८० वर्षांच्या आजीला बनवलं बिझनेस वुमन
Sushma Andhare : “आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला