नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाबसह चार राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबमधील सत्ता गेल्याने काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद पेटला. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे.
पंजाबची सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यावर माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांनी टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर टीकेची झोड उठवणारे सुनिल जाखड यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे सुनिल जाखड यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
सुनिल जाखड यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी गुडबाय, गुडलक काँग्रेस,असं म्हणत पक्षाला रामराम केला. यावेळी त्यांनी पक्षातील जुन्या सहकाऱ्यांवरही सडकून टीका केली. पंजाब काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्यावर केलेल्या पक्षविरोधी कारवायांच्या आरोपानंतर शिस्तपालन समितीने आपल्याकडील सर्व पदे काढून घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच पक्ष सोडत असताना काँग्रेसच्या राहुल गांधी यांची चांगली व्यक्ती म्हणून प्रशंसा केली. आपल्याकडे असलेल्या पक्षाच्या सर्व सोशल मीडियामधून ते बाहेर पडले असून आपल्या ट्वीटरवरून पक्षाचा फोटोही हटवला आहे. तसेच त्यांनी ट्वीटरच्या बायोमधून पक्षाची माहिती काढून टाकली आहे.
जाखड यांना नुकतीच पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. चन्नी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज जाखड यांनी थेट पक्ष सोडल्याचीच घोषणा केली. गुडबाय, गुडलक काँग्रेस, असं म्हणत त्यांनी पक्षाला रामराम केला.
काँग्रेस नेतृत्वाची बैठक उदयपूरमध्ये सुरू असतानाच जाखड यांनी पक्षाला धक्का दिला आहे. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असताना जाखड यांच्या जाण्याने पक्षाला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.