Sanjay Jagtap : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस (Congress) पक्षाला महाराष्ट्रात अनेक धक्के बसले आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यात काँग्रेसमधून नेत्यांची गळती सुरुच आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि काढताचाच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता पुरंदर (Purandar) मतदारसंघाचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
१६ जुलै रोजी संजय जगताप हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party – BJP) प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत सासवड (Saswad) येथे होण्याची शक्यता आहे.
संजय जगताप यांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत पुरंदर विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी शिवसेना (Shivsena) उमेदवार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती. विशेष म्हणजे, त्याच विजय शिवतारे यांनी २०२४ च्या निवडणुकीत संजय जगताप यांचा पराभव केला. आता संजय जगताप यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत थेट भाजपचा हात धरला आहे.
या घडामोडींमुळे काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा फटका बसत आहे. भोरचे संग्राम थोपटे यांच्यानंतर आता पुरंदरचे संजय जगताप यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपले पाय अधिक घट्ट रोवले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचे एकामागून एक जाणे पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामती (Baramati) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी प्रचार करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार भाषण दिलं होतं. त्या सभेत त्यांनी शिवसेना आमदार विजय शिवतारेंवर थेट निशाणा साधला होता.
“तू आमदार कसा होतो तेच मी बघतो”, अशी थेट धमकी अजितदादांनी सभेतून दिली होती. शिवतारेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केल्यानंतर अजित पवारांनी त्यांचा पराभव घडवण्यासाठी विधानसभेत पूर्ण ताकद झोकून दिली होती. “माझं ठरलं की कोणी आमदार होणार नाही, तर कोणाच्या बापालाही मी विचारत नाही”, असं सडेतोड वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांनी ३१,४०४ मतांनी विजय मिळवला होता.
आता हेच संजय जगताप, ज्यांच्या विजयामध्ये अजित पवारांचा महत्त्वाचा वाटा होता, तेच नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.






