Share

BJP : भाजपच्या माजी आमदाराचे कर्करोगामुळे निधन, दोन दिवसांपुर्वीच फडणवीसांनी घेतली होती भेट

Baburav Pacharne

BJP : शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी असून आज वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

बाबुराव पाचर्णे यांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच प्रकृतीविषयीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ते राजकारणापासून थोडे लांब गेले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले असून पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दीड वर्षांच्या या कालावधीत कर्करोगामुळे त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले. अखेर आज त्यांनी रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला.

बाबुराव पाचर्णे हे तालुक्यातील तर्डोबाची वाडी या एका छोट्याशा वाडीत शेतकरी कुटूंबात जन्मले होते. त्यामुळे त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली होती. १९७८ साली ते शिरूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवला आणि पुढे तालुका पातळीवरील राजकारणात प्रवेश केला.

१९९५ मध्ये बाबुराव पाचर्णे यांनी अपक्ष म्हणून प्रथम विधानसभेची निवडणूक लढविली. जवळपास निश्चीत झालेली कॉंग्रेसची उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने त्यांना कोणत्याही पक्षाची मदत मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी तगडे आव्हान उभे केले होते. त्या निवडणुकीत केवळ ६७८ मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी १९९९ ची निवडणूक कॉंग्रेसकडून लढविली, मात्र त्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही.

पुढे, बाबुराव पाचर्णे यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच त्यांनी पहिल्यांदा विधनासभा जिंकली. २००९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढविली आणि तिथेदेखील त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. त्यानंतर ते २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपमध्ये परतले आणि त्यांनी यश मिळवले. राजकीय कारकिर्दीतील शेवटच्या ठरलेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीतही त्यांना अपयशच पत्करावे लागले.

बाबुराव पाचर्णे यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची शिरुर येथे रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी, मुलगा राहुल पाचर्णे, एक मुलगी, नातवंडे, चार भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या
Rakshabandhan : रक्षाबंधनच्या आधीच गमावले दोन सख्खे भाऊ, मामानेच केला भाच्यांचा घात, वाचून हादराल
Eknath Shinde : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्रिपद न मिळाल्याने ‘हे’ पाच आमदार नाराज
Priya Bapat: अब पैसा कौन देगा रे? प्रिया बापटला का पडली पैशांची गरज? वाचा नेमकं काय घडलं
Tata punch : टाटाच्या ‘या’ स्वस्त कारने घातला धुमाकूळ, ओलांडला १ लाखांचा टप्पा, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now