युक्रेनवरती रशियाने हल्ला केल्यामुळे अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लादले. अशावेळी रशियाने होत असणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. आता रशियानंतर आणखी एका देशानं भारताला ऑफर दिली आहे.
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम झाला आहे. तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. खनिज तेलाचे दर वाढले आहेत. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियावर अमेरिकेसह युरोपियन देशांनी निर्बंध लादले. त्यामुळे रशियाचं आर्थिक नुकसान होत आहे.
अशा परिस्थितीत रशियानं भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर आता आणखी एका देशानं भारताला प्रस्ताव दिला आहे. हा देश दुसरा तिसरा कोणी नसून, इराण आहे. इराणने भारताला खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
भारताच्या उर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू, असे चेगेनी यांनी म्हटले आहे. तसेच दोन्ही देशात रुपया-रियालच्या माध्यमातून होणारे व्यवहार पुन्हा सुरू झाल्यास द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा विश्वास चेगेनी यांनी व्यक्त केला.
इराण भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश होता. मात्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादले. त्यांच्या खनिज तेल निर्यातीवर प्रतिबंध लादले गेले. त्यामुळे त्याचा परिणाम इराण आणि भारत यांच्या व्यवहारावर झाला. भारताला इराणसोबतचे तेल व्यवहार रोखावे लागले.
भारताला रुपयामधून तेल व्यवहार करण्याची मुभा देणारा इराण हा एकमेव देश आहे. इतर सर्व देशांना भारताला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. याशिवाय इराण भारताला काही दिवसांचं क्रेडिटही देतो, त्यामुळे या गोष्टीचा फायदा भारताला होतो आणि तेल खरेदी केल्यानंतर लगेच पैसे दिले नाही तरी चालते.