सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने थोडी कपात केली आहे, मात्र तरीही त्यांच्या किंमती 100 रुपयांच्या खाली येण्याची अजून चिन्हे दिसत नाहीत. अशावेळी तुमची मोटारसायकल जर चांगली मायलेज देत नसेल तर तुम्हाला दर महिन्याला पेट्रोल भरण्यासाठी हजार रुपये देखील कमी पडतील.
पेट्रोलसाठी तुमचा एवढा खर्च होत असेल तर, नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक बजेटवर पडतो. त्यामुळे तुमच्या मोटारसायकलचे मायलेज वाढवण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. या टिप्स वापरल्या तर तुमच्या गाडीचे मायलेज नक्कीच वाढेल. जाणून घेऊ त्याबद्दल.
पहिली टीप म्हणजे, तुम्ही तुमच्या बाइक-स्कूटरची नियमित सर्व्हिसिंग करायला हवी. दुचाकीचं मायलेजचे कमी होण्याचं सर्वात मोठं आणि पहिलं कारण म्हणजे वेळेवर सर्व्हिस न मिळणं. बाइकमध्ये इंजिन ऑइलसह अनेक गोष्टी असतात, ज्या सर्व्हिस दरम्यान बदलल्या जातात, दुरुस्त केल्या जातात, साफ केल्या जातात आणि इंजिन ट्यूनिंग सेट केले जातात. त्यामुळे तुमची टू व्हीलर चांगलं मायलेज देत राहते.
पण जर तुम्ही तुमच्या बाइकची नियमित सर्व्हिसिंग करत आहात मात्र तरीदेखील मायलेज चांगलं मिळत नाही. अशा वेळी कार्ब्युरेटरची सेटिंग बदलण्याची गरज असते. ही तुमची दुसरी टीप आहे. कार्ब्युरेटरची सेटिंग इलेक्ट्रिक आणि मॅन्युअली दोन्ही बदलण्याची गरज असते. त्याच्या मदतीने बाइकचे मायलेज सुधारण्यास मदत होते.
तुम्ही बाइक वापरत असताना चांगलं मायलेज मिळवण्याचा तिसरा आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे टायर प्रेशर मॉनिटर करत राहा. बाइक किंवा स्कूटरच्या टायरमध्ये कमी हवा असल्यास या गोष्टीचा इंजिनवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे इंजिनला अधिक मेहनत करावी लागते.
परिणामी तुमच्या टू-व्हीलरच्या मायलेजचं गणित बिघडतं. टू व्हीलरचं इंजिन अधिक इंधनाचा वापर करु लागतं. त्यामुळे तुमच्या टू व्हीलरच्या टायर्समध्ये पुरेशी हवा असणं खूप गरजेचं आहे. या गोष्टीची काळजी घेतली तर तुमची बाइक चांगलं मायलेज देत राहील.
तसेच कमी स्पीडमध्ये तुम्ही बाईक फक्त पहिल्या आणि दुसऱ्या गीअरवर चालवावी आणि हाय स्पीडमध्ये तिसरा आणि चौथा गियर वापरावा. जर तुम्ही तिसरा किंवा चौथा गियर कमी वेगाने वापरला तर त्याचा थेट परिणाम बाईकच्या मायलेज वरती होतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचे आहे.
क्लचच्या अतिवापराचा थेट परिणाम मायलेज वरती होतो. त्यामुळे बाईक चालवताना क्लचचा कमीत कमी वापर करा. तसेच जेव्हा रस्त्यावर सिग्नल लागतो, तेव्हा तो 15 सेकंदाचा असो, किंवा 1 मिनिटांसाठी अशावेळी गाडीचे इंजिन तुम्ही बंद केले पाहिजे. त्यामुळे इंधन कमी जळतं आणि साहजिकच गाडीचे मायलेज वाढते.