महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडले आहे. सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याठिकाणी तलावाचे खोदकाम सुरू होते, तेव्हा हे शिल्प आढळून आले आहे. या पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत.
माहितीनुसार, हे शिल्प ज्या तलावात सापडले त्या तलावाच्या काठावर असलेल्या हेमांडपंतीय मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आले आहे. माहितीनुसार, जिल्ह्यात पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये शिल्प पाहण्यासाठी तलावाच्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मुल तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सुरू आहे. या तलावाच्या पाळीवर देखणे हेमाडपंथीय शिवमंदिर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू आहे. आठवडाभराआधीच इथं यमदेवाचं शिल्प देखील मिळालं होतं.
नागपूर पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वाहणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिल्प शिवाचे आहे. फोटो मध्ये देखील आपल्याला दिसून येईल की, हे शिल्प शिवाचे असून, त्याच्या गळ्यात नाग आहे. हे शिल्प दिसायला अतिशय देखणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्प 5 इंचाचे आहे. टेराकोटाने बनविलेल्या या शिल्पावर लाल पॉलीश मारलेली आहे. पंचमुखी शिवलिंगावर भगवान शिवाचे पाच शिल्प कोरले आहेत. हे शिल्प एवढे देखणे आहे की पाहिल्यानंतर प्रसन्न वाटते असे काहींचे म्हणणे आहे.
पंचमुखी शिवलिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल काहींना प्रश्न पडला असेल. तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, शिवाचे पश्चिम मुख हे पृथ्वी तत्त्व म्हणून पुजले जाते. त्याचे उत्तर मुख हे जल तत्त्व, दक्षिण मुख हे तेजस तत्त्व आणि पूर्व मुख हे वायू तत्त्व म्हणून पुजले जाते. भगवान शिवाचे वरचे मुख हे आकाश तत्त्व म्हणून पुजले जाते.