Share

अक्कलकोटला दर्शनासाठी आलेल्या पाच भाविकांचा अपघातात जागीच मृत्यू ,तर दोन जण गंभीर जखमी

कर्नाटकातील गाणगापूरला दर्शनासाठी जात असताना अहमदनगरमधील भाविकांच्या गाडीचा अपघात होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कर्नाटकातील बळोरगी गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृत अहमदनरचे असून ते अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आले होते. काल दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. यावेळी हे भाविक गाणगापूरहून अक्कलकोट मार्गे अहमदनगरला परत जात असताना हा अपघात झाला आहे.

कर्नाटकमधील बळोरगी गावाजवळ चालकाचा गाडीवरून ताबा सुटला. त्यामुळे गाडी झाडाला आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदत करत कारमधील सर्व मृतदेह बाहेर काढले आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यानंतर पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. समोरूनच झाडाला धडक दिल्यामुळे गाडीच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. काचा फुटल्यामुळे अथक परिश्रमानंतर स्थानिकांनी कारमधील मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर साहिली बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकरा सुरवशी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now