मागील दोन वर्षात कोरोनामुळे कोणताही सण थाटात साजरा करता न आल्याने लोकांनी यावर्षी प्रत्येक सण अगदी दणक्यात साजरा केला आहे. यावर्षीचा गुढीपाडवा, गणपती, नवरात्र हे सगळे सण अगदी थाटात पार पडले. आता लोक वाट पाहत आहेत ती दिवाळीची.
दिवाळी अगदी एक आठवड्यावर आली आहे. त्यासाठी आत्तापासूनच सगळीकडे तयारी सुरू आहे. घरोघरी मोती साबणापासून फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेकजण फटाक्यांच्या खरेदीला लागले आहेत.
मात्र, फटाक्यांमुळे प्रदूषण होतं, पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कृपया फटाके उडवू नका असा संदेश बहुदा या देशातील प्रत्येक फिल्मस्टार, क्रिकेटपटूपासून कित्येक सेलिब्रिटी देतात. आता मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याचाही असाच एक संदेश देणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूल समिती’च्या ‘फटाकेमुक्त दिवाळी’ या उपक्रमासाठी जितेंद्र जोशी याने एक व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये त्याने फटाके न उडवण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो जास्त फटाके फोडेल त्याच्या घरी जास्तीत जास्त लक्ष्मी येते या लोकांच्या मान्यतेवरही त्याने या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे.
https://fb.watch/gbAMjrM08I/
व्हिडीओमध्ये जितेंद्र जोशी म्हणतो, त्याच्या मुलालाही तो फटाक्यापासून दूर ठेवतो. फटाक्यांच्या आवाजामुळे प्रदूषण होतं आणि प्राणी पक्ष्यांनाही त्रास होतो. शिवाय फटाक्यांसाठी लागणाऱ्या पैशांचा सदुपयोग करा आणि यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असा संदेश जितेंद्र जोशीने दिला आहे.
तसेच म्हणाला, मी देखील लहानपणी फटाके उडवायचो पण, फटाके बनवणाऱ्या फॅक्टरीवरील एक डॉक्युमेन्ट्री पाहून माझं मनपरिवर्तन झालं, असे जितेंद्र जोशी म्हणाला. जितेंद्रचा ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
.