Share

फायर आजींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, ‘तो गेलाय पण तुम्ही घाबरू नका..’

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. दरम्यान, पुष्पा चित्रपटातील डायलॉगमुळे प्रसिध्द झालेल्या फायर आजींनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केला. ते नॉटरिचेबल झाले. शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाही आमदाराने समोर येऊन सांगावं, लगेच मुख्यमंत्रिपद सोडतो, अशी भूमिका घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या आंदोलनावेळी चर्चेत आलेल्या या  ९२ वर्षांच्या शिवसैनिक आजी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी पुढे आल्या आहेत. यावेळी आजीने उद्धव ठाकरेंना धीर देण्याचे काम केले.

आजी म्हणाल्या, तुम्ही काही काळजी करू नका शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही काळजी घ्या. तो रिक्षावाला होता तो आमदार-खासदार झाला, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ नाही असे देखील त्या म्हणाल्या.

बंड केलेल्या शिवसेनेच्या आमदारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ते कट्टर शिवसैनिक असले, तर साहेबांकडे माघारी येतील. जे गेले ते गेले. ते शिवसैनिक नाहीत. एकनाथ शिंदे माफी मागायाला येतील. उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाहीत, असे आजी म्हणाल्या.

मध्यंतरी राणा दांपत्य जेव्हा मातोश्री या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार होते तेव्हा शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनात या आजी सहभागी झाल्या होत्या. या आजींचे नाव चंद्रभागा शिंदे आहे. ९२ वर्षांच्या या आजी तेव्हापासून चर्चेत आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now