अखेर आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द पाळला; मिनी जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रयला दिली बोलेरो गाडी भेट…

जुगाड जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहार देशभर चर्चेत आलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोहार कामातील पारंपरिक कौशल्याचा वापर करत त्यांनी जिप्सी बनवली होती. या गाडीचे साहित्य जमवण्यासाठी त्यांना दोन वर्षे वाट पहावी लागली होती. गाडी अखेर पूर्ण झाली. त्यांच्या गाडीचा या दरम्यान व्हिडिओ वायरल झाला होता. या व्हिडिओची आणि त्यांच्या या कामाची दखल घेत आनंद महिंद्रा यांनी त्यांना बोलेरो गाडी देण्याची ऑफर दिली होती. महिंद्रा यांनी दिलेला शब्द पूर्ण करत अखेर त्यांना आज बोलेरो गाडी भेट देण्यात आली.

दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे. आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रय यांनी गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. दत्तात्रय लोहार यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. नेते मंडळीपासून सर्वांनी या मिनी जिप्सीत फेरफटाका मारत त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

यादरम्यान, महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रयची गाडी पाहत त्याचे कौतुक करत मिनी जिप्सीच्या बदल्यात नवी बोलेरो  गाडी त्याला  भेट देण्याचे ट्विटच्या माध्यमातून  दिले आश्वासन दिले होते. मात्र दत्तात्रय यांनी आपण बनवलेली ही गाडी आपलीलक्ष्मी आहे असं म्हणत आपण ही गाडी देणार नसल्याचे म्हंटले होते. मात्र त्यांचा हा विचार बदलला आणि दत्तात्रय लोहार यांनी स्वतः बनवलेली मिनी जिप्सी महिंद्रा ग्रुपच्या ताब्यात देत नवीकोरी बोलेरो गाडी भेट घेतली.

गाडी दत्तात्रय यांच्या हाती सुपूर्त केल्यानंतर, बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले. यावेळी विशाल पाटील यांनी देखील ट्विट करत दत्तात्रय यांचे कौतुक केले आणि महिंद्रा यांनी शब्द पाळला असे सांगितले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी दत्तात्रय लोहार तयार केलेल्या मिनी जिप्सीवर गाणं तयार केले आहे. गाडी पॉम पॉम, गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटार, या गाडीला दत्ताभाऊ डायवर. असे गाणे त्यांनी यावर रचले आहे. त्यामुळे ही जीप्सी आणि हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या हस्ते लोहार कुटुंबीयांना नव्या गाडीची चावी देण्यात आली. सहकुटुंब उपस्थित राहत दत्तात्रय लोहार यांनी हि गाडी स्वीकारली. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आनंद महिंद्रा यांचे देखील अनेकांनी ट्विट करत आभार मानले.