दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला. काश्मिरी पंडितांच्या निर्गमनावर बनलेला हा चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे लोक कौतुक करत आहेत.
“द काश्मीर फाईल्स” या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावादी, पुनीत इस्सार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वजण त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
“द काश्मीर फाईल्स” हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे, ज्यात विवेक अग्निहोत्री यांनी 90 च्या दशकातील काही वादांना मांडले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. पहिल्या दिवशी कमी प्रेक्षक होते, मात्र त्यानंतर चित्रपटाला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला.
चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या कौतुकामुळे प्रेक्षकसंख्या वाढली आहे. राजकारणात देखील हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय करत आहे. चित्रपट पाहून थक्क झालेले लोक आता विवेक अग्निहोत्रीला इतर विषयांवरही चित्रपट बनविण्याची विनंती करत आहेत.
‘द काश्मीर फाईल्स’ रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरुच आहे. विविध विचारसरणीचे लोक आपले मत मांडून चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहेत. आता #TheKashmirfiles सोबत #Godhra सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. लोकांनी विवेक अग्निहोत्री यांना काश्मीर फाईल्स नंतर गोधरा हत्याकांड वरती चित्रपट बनविण्याची विनंती केली आहे.
तसेच ‘द 1947 फाईल्स’ ट्रेनच्या आगीवरील “द गोधरा फाईल्स”, पोलिस गोळीबारावर “द कारसेवक फाईल्स” आणि गॅस घोटाळ्यावर “द भोपाळ फाईल्स” असे चित्रपट देखील बनविण्यासाठी प्रेक्षकांनी विवेक अग्निहोत्रीला मागणी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या मुद्यांवर चित्रपट येणार का या प्रतीक्षेत लोक आहेत.
सोशल मीडियावर ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर अनेकजण टीका करतानाही दिसत आहेत. त्याचबरोबर काही लोक या टीकेला प्रत्युत्तर देतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर लोक चित्रपटातील अनेक मुद्दे मांडत वाद-प्रतिवाद घालताना दिसत आहेत. अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्त केला आहे.