नवरा बायकोच्या भांडणात एक वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. सख्या बापानेच मुलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना घडली आहे. बायकोवर असलेल्या संशयावरून बापाने रागात मुलीलाच खड्ड्यात जिवंत पुरून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरणात निर्माण झालं आहे.
ही धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे. सुरेश घुगे असे निर्दयी पित्याचे नाव असून, त्याचे वय सत्तावीस वर्ष आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश घुगे हा वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात आपल्या पत्नीसोबत राहतो. पत्नीचे नाव कावेरी आहे.
त्याला तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी पत्नी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची. यातून त्याला व्यसनाची सवय लागली. काल नेहमीप्रमाणे त्यांच्यात भांडण सुरू होते, यात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिने जीव वाचवण्यासाठी गावाकडे धाव घेतली, आणि सर्व प्रकार आपल्या दीराला सांगितला.
यानंतर लोक त्याच्या घराकडे आले. मात्र घरात कावेरीला तिची 1 वर्षांची मुलगी दिसली नाही. चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली. त्यानंतर त्याने तिला पुरलं असल्याचं सांगितलं. यामुळे सर्वांना धक्का बसला. लोकांनी मुलीचं शव उकरून बाहेर काढलं.
नराधम बापाच्या या निर्घृण कृत्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. बातमी समजताच पोलीस घटनास्थळी आले, आणि सुरेशला अटक केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भयानक घटनेवरती कोणाचा विश्वास बसेनासा झाला आहे.
अनेक ठिकाणी नवरा-बायको यांच्यातील वाद एवढे टोकाला जातात की, त्याचा शेवट असा गहाण होऊन संपतो. रागातून एका बापाने निरागस चिमुकलीचे आयुष्यच संपून टाकले आहे, ही बाब वाऱ्यासारखी पसरली असून, अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.