मागील काही दिवसांमध्ये अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आर. पी. एन. सिंह यांचा समावेश आहे. अशातच पुन्हा एकदा कॉंग्रेसला खिंडार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल हे पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे.
फैसल यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ते पक्षावर नाराज झाले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच ही नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केल्याने पक्षांतरच्या चर्चाना अधिकच उधाण आले आहे. त्यांनी केलेले एक ट्विट सध्या तुफान व्हायरल होतं आहे.
वाचा काय आहे ट्विटमध्ये.. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी पक्षावर बॉम्ब टाकत फैसल यांनी एक ट्विट केले आहे. त्यामधून त्यांनी कॉंग्रेसला लक्ष केले आहे. ‘आता वाट पाहून दमलो आहे. सर्वोच्च नेतृत्वाकडून प्रोत्साहन मिळालेले नाही. माझ्या बाजूने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत, असे सूचक ट्विट फैसल यांनी केले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल हे सोनिया गांधींचे विश्वासू आणि निकटवर्ती सहकारी मानले जात. गांधी परिवाराशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आता त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी काँग्रेसला थेट इशारा दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
तसेच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन.सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच मागील वर्षी माजी केंद्रीय मंत्री व यंग ब्रिगेडमधील नेते जितीन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काँग्रेसला लागलेली गळती अजूनही थांबण्याच नाव घेत नाहीये.