महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेनेने ‘हा’ निर्णय परस्पर घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी

नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला. तर दुसरीकडे शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केली. मात्र, यावरून आता महाविकास आघाडीत नाराजीनाट्य दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून विश्वासू दानवेंवर विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. शिंदेंच्या बंडानंतर अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते आणि सामान्य शिवसैनिक एकनिष्ठ राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते.

दानवे यांनी वार्डात, शहरात, गावात बैठका घेत संघटनेचा आढावा आणि फेरबांधणी केली. परिणामी बंडखोर आमदार व त्यांच्या निवडक समर्थकांशिवाय मुळ शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले. शिवाय बंडखोरांकडून होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तरही दिले.

याचेच बक्षिस म्हणून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दानवे यांच्यावर सोपावली अशी सर्वत्र चर्चा आहे. मात्र, आता दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

काँग्रेसने दानवे यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस इच्छुक होती. परंतु आम्हाला न विचारताच शिवसेनेने परस्पर हा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत स्वाभाविक नाराजी आहे.

यावर शिवसेनेने प्रतिउत्तर दिलं आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, ज्यांचा आकडा मोठा त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद, विधान परिषदेत आमचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमचाच आहे. नियमानुसार तेच असते, असे अरविंद सावंत म्हणाले.