Share

Mumbai : आघाडीत बिघाडी! अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत काॅंग्रेस शिवसेने विरोधात उमेदवार उतरवणार

आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिंदे आणि फडणवीस एकत्र लढणार आहेत. त्यात आता मुंबईतील एका पोटनिवडणूकीत शिवसेनेविरुद्ध भाजप -शिंदे गट आणि काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर शिंदे गट डोळा ठेवून असतानाच भाजपने उमेदवार देण्याची तयारी दर्शवल्याचं आधीच समोर आलं होतं.

मात्र, आता या निवडणुकीत महाविकास आघाडीतही धुसफूस झाल्याचं बोललं जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना तिकीट देण्याचं निश्चित केलं आहे. मात्र आपल्यासोबत चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत चर्चा न केल्यामुळे मुंबई काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे. आम्ही यापूर्वीसुद्धा ही जागा लढवलेली असल्यामुळे उमेदवार उतरवू शकतो किंवा शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो, याबाबत पक्षांतर्गत चर्चेनंतर निर्णय होईल, असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अंधेरी पूर्वच्या जागेवर दावा सांगितला होता, मात्र भाजपने ही जागा हिसकावत शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

रमेश लटके यांच्याबद्दल माहिती म्हणजे, ते मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार होते. ते १९९७ पासून सलग तीन वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदावर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी लटकेंना विधानसभेचं तिकीट दिलं.

तेव्हापासून रमेश लटके सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र मे महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने रमेश लटके यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी दुबईत त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे आता त्यांचं पद रिक्त झाल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now