शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सध्या राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. आज पहाटे मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर पाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले, रुग्णालयात उपचार करताना त्यांनी प्राण सोडले.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर एमजीएम रुग्णालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विनायक मेटे यांनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज केला होता. मेसेजमध्ये म्हटलं होतं की, ‘मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावलीय त्यासाठी येतो. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाइटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो’.
त्यांचा हा मेसेज देवेन्द्र फडणवीस यांनी सकाळी वाचला. मराठा आरक्षणासंदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विनायक मेटे हे मुंबईला येत होते. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मेटे यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दबाबत कौतूक केलं.
म्हणाले, मेटे यांचं संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं. गरिबीतून वर येऊन स्वत:च्या भरोशावर उभा राहिलेलं नेतृत्व होतं. मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी लढला. यासंदर्भात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. माझ्यासाठी ते जवळचे सहकारी होते असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विनायक मेटेंच्या निधनानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मेटे यांच्यात जी तळमळ होती, त्या भावनेसोबत आमचं सरकार राहणार आहे, त्यांच्या कुटंबियांच्या दुखात आम्ही सहभागी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.