भारतीय जनता पक्षामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाच्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच नाव वगळण्यात आल्याने आता या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकही नेता नाही.
या नव्या संसदीय समितीमधून नितीन गडकरी यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही नाव वगळण्यात आले आहे. हे दोन्ही वरिष्ठ नेते आधी या समितीमध्ये होते, मात्र आता त्यांना या नवीन समितीमध्ये स्थान देण्यात आलं नाही.
शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांच्या जागी आता आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या नावाचा समावेश या समितीत करण्यात आलेला नाही.
संसदीय समितीमध्ये सुधा यादव, के. लक्ष्मण, सत्यनारायण जटिया आणि इक्बाल सिंह लालपुरा या नेत्यांना समितीत स्थान देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे समितीत कायम आहेत.
जेपी नड्डा हे संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. भाजपची ही संसदीय समिती एकूण ११ सदस्यांची आहे. या समितीतून दोन नेत्यांना वगळण्यात आलं आहे. तर बीएस येडियुरप्पा,सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण या तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने संसदीय समितीसोबतच केंद्रीय निवडणूक समितीची देखील घोषणा केली आहे. या समितीत एकूण १५ जण आहेत. या समितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांना या समितीत स्थान देण्यात आलेलं आहे.