काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर राज्यात भाजपनं सत्ता स्थापन केली. परंतु सत्ता मिळवल्याच्या काही महिन्यांतच भाजपला बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण आता नागपूरातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपला जोरदार धोबीपछाड दिला आहे. त्यामुळं आता राज्यात सत्ता असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरातील १३ तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांत कॉंग्रेसनं सत्ता मिळवली आहे. कोणत्याही तालुक्यातील पंचायत समिती जिंकता न येण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. त्यामुळं आता भाजपच्या या पराभवाची राज्यभर चर्चा होत आहे.
नागपूरात नऊ तालुक्यांतील पंचायत समित्यांवर कॉंग्रेसचा विजय झाला असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि नरखेडसह हिंगणा या तालुक्यांतील पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. याशिवाय रामटेक तालुक्यातील पंचायत समितीची सत्ता राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाकडे गेली आहे.
भारतीय जनता पक्षाला केवळ दोन तालुक्यांत उपसभापतीपदावर समाधान मानावं लागल्यानं आता जिल्ह्यात दिग्गज नेते असूनही भाजपला जिल्ह्यात मोठा पराभव पत्करावा लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान नागपूर जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील नागपूरातूनच खासदार असल्यानं जिल्ह्यात भाजपची मोठी राजकीय ताकद आहे. परंतु राज्यात महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग झाल्यानंतर दीड वर्षांपूर्वी झालेल्या नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपचा सुपडा साफ केला आहे.
फक्त भाजपच नाही तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचेही काही मोठे नेते नागपूरातून येतात. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन राऊत हे देखील नागपूरचेच आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील नागपूरातील काटोलमधून आमदार आहेत.






