मुंबईत राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन झालेल्या वादावर आणि रात्री किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्र राजकारण आधीच तापलं असताना आता आणखी एक धक्कादायक घटना राजकीय वर्तुळात घडली आहे. या घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही अमरावती जिल्ह्यात घडली आहे. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर रात्री वरुड शहरात मुलताई चौक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. यात योगेश घारड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. माहितीनुसार, त्यांना उपचारासाठी नागपूरला आणण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. घारड यांच्या मांडीला गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप योगेश घारड यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला, याचे नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
सुरुवातीला हा हल्ला अज्ञातांनी केला असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यानंतर हा हल्ला राहुल तडस नावाच्या एका व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराचा पाठलागही करण्यात आला. मात्र हल्लेखोर पसार झाला. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहे.
या घटनेने वरुड शहरात खळबळ उडाली आहे. परिसरात योगेश घारड यांच्या समर्थकांची रात्री मोठी गर्दी झाली होती. तणावाची स्थिती लक्षात घेत शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून घारड समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकीकडे काल मुंबईत अमरावतीचे दिग्गज राजकीय नेते राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिकडे अमरावतीत झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यावरील हल्ल्यामुळे अमरावतीचं राजकारण ढवळून निघालं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.