कोणतीही नोकरी लागण्यासाठी आधी शिक्षण गरजेचं असतं. संबंधित कामासाठी पदवी महत्वाची असते. मात्र आता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. तरुणांच्या नोकरी देण्यासंदर्भात ही घोषणा असून, यासाठी डिग्रीची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल दिल्लीत निती आयोगाच्या एक्सपीरियन्स स्टुडिओचं लॉन्चिंग केले. यावेळी ते बोलत होते. म्हणाले, पुढील काही वर्षांत देशात जवळपास 1 लाखांहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार आहे. त्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही.
केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होईल असे म्हणाले. या नोकरी विषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बारावी उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात. ड्रोन पायलट होण्याची इच्छा असलेल्यांना दोन- तीन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल.
तसेच, यासाठी कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही. येणाऱ्या काही वर्षांत जवळपास 1 लाख ड्रोन पायलट्सची आवश्यकता भासेल. महत्वाचं म्हणजे या ड्रोन पायलटला 30 हजार रुपये मासिक पगार मिळेल, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. त्यांच्या या घोषणेमुळे काहींना दिलासा मिळाला आहे.
यावेळी ते म्हणाले, 2030 पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन बनवण्याचं लक्ष्य आहे. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असल्याचं त्यांनी सांगितले.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सरकार या नोकरी मार्फत कमाईची संधी देणार असल्याने अनेकांनी या घोषणेचे स्वागत केले. या भरतीमुळे तब्बल 1 लाख तरुणांना रोजगार मिळू शकतो. या घोषणेच्या अंमलबजावणीची सर्वजण वाट पाहत आहेत. यामुळे थोडीतरी बेरोजगारी कमी होण्यात नक्कीच मदत होईल.