नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी पार पडली. दसरा मेळाव्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यावर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार वाशिममध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे. यासाठी आमच्या अगोदर अर्ज केला होता. त्यामुळं शिवाजीपार्क मैदान त्यांना मिळाले आहे. मात्र आमचाही दसरा मेळावा मुंबईतल्या बिकेसीवर होणार, त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवाज घुमणार आहे.
तसेच सत्तार म्हणाले, मुंबईतील बीकेसी मैदानावर ५ तारखेला दसरा मेळावा होणार आहे. ती इतिहासात न होणारी सभा राहणार आहे. तसेच अब्दुल सत्तार म्हटले की, आम्ही सरकार सोडून बाहेर गेलो. तेव्हा मुंबईत येऊन दाखवा, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. तेव्हा शिंदे साहेब म्हणत होते ह्या पोकळ धमक्या आहेत. मी ऐकला जातो राज्यपाल यांची भेट घेतो.
एकनाथ शिंदे यांनी तेव्हा सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्यपालांपुढे ठेवला, असे सत्तार म्हणाले. शिवसेना शिंदे साहेबांची आहे. त्यांनाच धनुष्य बाण निशाणी मिळणार असे अब्दुल सत्तार म्हणाले. ‘मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल,’ असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, खासदार भावना गवळी यांनी देखील उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज दसरा मेळाव्यात घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य आहे. राज्यभरातून मुंबई येथील मेळाव्याला १० लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील.
गेल्या काही दिवसांपासून, दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळणार की शिंदे गटाला, अशी चर्चा राज्यभर सुरू होती. मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना हिरवा दिवा दाखवून, शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी दिली.