सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये बैलगाड्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच एका ठिकाणी बैलगाडी शर्यतीत एक दुर्घटना घडली आहे.
रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे 2 फेब्रुवारी 2022 मध्ये बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव समुद्रकिनारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्पर्धेदरम्यान अचानक बैल उधळले आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये बैलगाडी घुसली.
यावर, एकच गोंधळ उडाला. पळापळ पाहिला मिळाली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानंतर बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिली, मात्र काही ठिकाणी सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं चित्र या घटनेतून समोर आले आहे. बैलगाडी शर्यतीदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मागील 5 ते 6 वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. आता बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे गाडीवान आणि शौकिनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, काही ठिकाणी हा उत्साह जीवावर बेतल्याचे समोर येत आहे.
2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु झाल्या आहेत.
बैलगाडी शर्यतीसाठी ठेवण्यात आलेल्या अटी म्हणजे, 1000 मीटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसेल अशा योग्य धावपट्टीवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येईल, बैलगाडी शर्यतीची धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खड़क असलेली, चिखल, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेले ठिकाण असलेली नसावी. बेलगाडी शर्यंत रस्त्यावर किंवा महामागांवर आयोजित करण्यात येऊ नये,अशा अनेक अटींचा समावेश आहे.