Share

कंपनीसाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं कष्टाचं फळ; CEO ने वाटल्या चक्क BMW कार, जाणून घ्या नेमकं कारण

कंपनीचे काम अतिशय प्रामाणिक केलं, तर त्याचं फळ नक्कीच मिळतं हे आपण ऐकत असतो. कंपनीचे मालक संबंधित कर्मचाऱ्यांना कंपनी सोबत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिल्याबद्दल गिफ्टच्या स्वरूपात काहीना काही देत असतात. आता एका कंपनीने चक्क कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून बीएमडब्लू कार भेट दिल्या आहेत.

हा प्रकार चेन्नईत घडला आहे. कोरोना काळात कंपनी अडचणीत असतानाही चांगल्या प्रकारे काम करुन कंपनीचा उभारी देण्याचं काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना एका आयटी कंपनीच्या सीईओने बीएमडब्लू कार भेट दिल्या आहेत. त्यामुळे सध्या या कंपनीची सर्वत्र चर्चा होत आहे.

ही एक सॉफ्टवेअर सेवा निर्यात करणारी कंपनी आहे. किस्सफ्लो इंक असे या कंपनीचे नाव आहे. या किस्सफ्लो इंकने प्रत्येकी एक कोटी रुपये किंमत असलेल्या पाच बीएमडब्लू कार या पाच कर्मचाऱ्यांना भेट दिल्या आहेत. कंपनीप्रति कर्मचाऱ्यांची असेलली निष्ठा आणि प्रामाणिक काम यामुळे कंपनीने त्यांना हे महागडे गिफ्ट दिले आहे.

किस्सफ्लो इंक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सुरेश संबंदम यांनी सांगितलं की, ज्या पाच कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे ते कर्मचारी हे कंपनीच्या प्रवासामध्ये सुरुवातीपासून सोबत आहेत, आजही उत्तम सेवा करत आहेत.

दरम्यान, या कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याचा कार्यक्रम अत्यंत गुप्त राखण्यात आला होता. ज्या कर्मचाऱ्यांना या कार भेट देण्यात येणार होत्या त्या कर्मचाऱ्यांना काहीच वेळ आधी ही माहिती देण्यात आल्याने ते कर्मचारी देखील सरप्राईज झाले होते. त्यांना स्वप्नांत देखील वाटत नव्हते असे गिफ्ट कंपनीने त्यांना दिलं, यामुळे ते प्रचंड खुश आहेत.

मध्यंतरी ब्रिटन मध्ये देखील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून 37 लाख रुपये दिलेले होते. त्याची देखील मध्यंतरी फार चर्चा होती. ब्रिटनच्या एमरी टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स हिपकिन्स यांनी आपल्या कंपनीच्या 60 सदस्यांमध्ये सुमारे 37 लाख रुपये वाटले होते.

इतर

Join WhatsApp

Join Now