नुकताच पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे शिवसेनेचा मेळावा पार पडला. त्यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवर टीका केली. हिम्मत असेल तर निवडणूक जिंकून दाखवा असं आव्हान बंडखोर आमदारांना त्यांनी केलं आहे.
संजय सावंत यांनी मेळाव्यात भाषण केलं. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवर टीका केली. म्हणाले, ‘जे सोडून गेले ते कावळे आणि जे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत.
तसेच म्हणाले, हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या. बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडेन. पाचोरा तालुक्यात किशोर पाटील नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी जरी निवडणूक लढविली तर त्यांचा पराभव करीन आणि शिवसैनिक विजयी होईल, जर असे झाले नाही तर बापाचे नाव लावणार नाही’ असे सावंत म्हणाले.
बंडखोर किशोर पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले, ज्यांना प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्यातील फरक ओळखता येत नाही, ते आज हिंदुत्वाचे धडे देतायत. काकांची पुण्याई आणि शिवसेनेच्या विचारावर जे पुढे आले ते आता एकनाथ शिंदे यांना बाप म्हणताहेत, है दुर्दैव आहे.
बंडखोरांना अडीच वर्षांनंतरच कसे अचानक दिवंगत आनंद दिघे आठवले ? १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढविला. ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आमदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसले.
जारगाव येथे झालेल्या या मेळाव्यात जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील, माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, तालुका प्रमुख शरद पाटील, आदी उपस्थित होते.