Dasara melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फजिती; सभा सुरू असतानाच लोकांनी घेतला काढता पाय, नेमकं काय घडलं?

काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन गटांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करुन आपलीच शिवसेना खरी असल्याचे काल राज्यातील जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यात तुफान गर्दी पाहायला मिळाली. शिंदेंच्या मेळाव्यात एवढे लोक आले की, अक्षरशः त्यांना बसायला देखील जागा नव्हती. बरेच लोक लांबून आले होते, काही लोकं ग्रामीण भागातून आले होते.

काहीजण मोठा प्रवास करून दुपारीच मैदानात हजर झाले होते. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. मैदान पूर्ण भरल्याने अनेकांना तर बाहेर रस्त्यावर उभे राहून सभा ऐकावी लागली. तर काहीजण मैदानात बसायला जागा नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वीच नाराज होऊन घराकडे परतले.

त्यात काल एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांचं भाषण अंतिम टप्प्यात असताना भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे दुपारपासून आलेले लोक सभा लांबू लागल्यानं निघून जाताना दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं भाषण सुरु असतानाच लोक निघून जाताना दिसून आलं.

दरम्यान, काल शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदारांनी मेळाव्यात सुरुवातीला भाषण केलं. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी भाषण करत ठाकरेंवर निशाणा साधला.

तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेची चर्चा फार कमी होताना दिसली. उद्धव ठाकरे यांनी देखील काल शिंदे गटावर आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटात पक्षचिन्हावरून वाद सुरु आहे. हा वाद कोर्टात देखील पोहोचला होता.

मात्र कोर्टाने निवडणूक आयोगाला यावर निर्णय देण्याचे अधिकार असल्याचे म्हटले होते. यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना धनुष्यबाण चिन्ह गोठवलेही जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. तसेच दुसरीकडे शिंदे गटाने नवीन चिन्हाबाबत तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.