shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या पक्षांमध्ये काही बिनसलं तर सरकार कोसळणं, आघाडी तुटणं, युती फुटणं हे घडताना लोकांनी पाहिलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेचा मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडला. मात्र हेच एकनाथ शिंदे एकेकाळी काँग्रेसकडे १५ आमदार घेऊन आले होते, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले.
अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याला आता शिवसेनेकडूनही दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले की, ‘एकनाथ शिंदे २०१४ मध्येच काँग्रेससोबत जायला आतुर होते. १५ आमदारांना घेऊन ते तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटायला गेले होते.’
पुढे ते म्हणाले, ‘परंतु वेळेतच मातोश्रीला या सगळ्याची कुणकुण लागली. आणि शिंदेंना माघारी बोलवण्यात आले. त्यामुळे हे सगळं जागीच थांबलं. एकनाथ शिंदे यांनी ही गद्दारी आधीच केली असती. पण त्यावेळी मातोश्रीला याबद्दल समजल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला,’ असं चंद्रकांत खैरे म्हणाले. काँग्रेससोबत का गेलात, असं म्हणत बाहेर पडणारे तेच एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जायला आतुर होते, असा टोला यावेळी एकनाथ शिंदे लगावला.
चंद्रकांत खैरे आणि अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर शिंदे गटाने नक्की कोणत्या कारणासाठी बंड केला? याबाबत राजकीय वर्तुळात मात्र संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे एकनाथ शिंदेंना रुचले नव्हते.
एकनाथ शिंदे यांनी या पक्षांसोबत युती नको. हिंदुत्ववादी विचार हेच आपले तत्व, अशी भूमिका घेत बंड केला. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? हे पहावे लागेल. मात्र सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याबाबत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.