Share

…म्हणून शिंदे गटानं केली धनुष्यबाण चिन्हं गोठवण्याची मागणी; ‘हे’ आहे खरं कारण

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक बदल घडून आले. त्याचबरोबर नवनवीन वाद निर्माण झाले. शिवसेना कुणाची? हा वाद अजूनच चिघळत चालला आहे. शिवसेना पक्षासोबतच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा हाही वाद सुरूच आहे.

आता धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे. सुप्रीम कोर्टानं यावर काहीही निर्णय दिला नाही. पण २७ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी घ्यायचं ठरवलंय. आता शिंदे गटानं अचानक धनुष्यबाण चिन्हं गोठवण्याची मागणी का केली, हेही जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे. त्याची कारणं काय, जाणून घेऊ.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक कधीही लागू शकते. निवडणूक आयोगाकडून कधीही या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. शिवसेना या मतदारसंघातून स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना रिंगणात उतरवयाच्या तयारीत आहे.

ऋतुजा लटके या धनुष्यबाण या चिन्हावर लढल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय, सहानुभूतीचा फॅक्टर आहेच. त्यामुळे  शिंदे-भाजपला आपला उमेदवार निवडून आणणं सोपं नाही. म्हणूनच या निवडणुकीआधी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून धनुष्यबाण मिळावा यासाठी शिंदे गट प्रयत्न करत आहे.

तसेच, मुंबईसह राज्यातील मुख्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटासोबत आहेत. तरीही अजून तरी शिंदे गटाला तांत्रिकदृष्ट्या शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली नाही.

अशा वेळी धनुष्यबाण हे चिन्हं अत्यंत निर्णायक भूमिका वठवू शकते. या चिन्हावर शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिले तर मतदार संभ्रमात पडू शकतो. धनुष्यबाण म्हणजे शिवसेना असंच समीकरण असल्यानं मतदार शिंदे गटाच्या पारड्यात मतदान करु शकतात आणि उद्धव ठाकरेंना याचा मोठा फटका बसू शकतो.

शिवसेना पक्षावरच्या अधिकृत दाव्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या चिन्हावरचा दावा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी आग्रही आहे. हे चिन्ह आपल्याला मिळत नसेल तर ठाकरे गटालाही मिळू नये आणि त्यासाठी चिन्हं गोठवण्याची मागणीच शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now