लराज्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. या दोन गटात सध्या अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एवढेच नाही तर हाणामारीपर्यंत मुद्दा गेला आहे. त्यातच आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना शुभेच्छा देणार का याकडे सर्वांचे लक्ष होते.
आज २७ जुलैला उद्धव ठाकरेंचा ६२ वा वाढदिवस आहे. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच वाढदिवस साजरा करणार आहेत. शिवसेनेसोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी देखील आज उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, त्यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे. त्यांनी ठाकरेंच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आई जगदंबेच्या चरणी शिंदेंनी प्रार्थना केली आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात सतत आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र आज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच शुभेच्छा व्यक्त केल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरून ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….’असे त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/mieknathshinde/status/1552132153932136451?t=Bj6YT1T916nAwFNlyC7-BA&s=19
यामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांनी शिवसेना प्रमुख न म्हणता माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख मानत नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणण्याचे टाळल्याने शिंदे यांची कट्टर भूमिका यातून दिसत आहे, अशी चर्चा होत आहे.