Ajit pawar : राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे सज्ज; अजितदादांचे अर्धा डझन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपशी हातमिळवणी केली. तेव्हपासून शिवसेनेला गळती लागली. अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करू लागले. असे असताना आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.

सध्या भाजप-शिंदे गटाची गाडी सुस्साट आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, नवी मुंबईतील सुमारे अर्धा डझन नगरसेवक अजित पवारांना धक्का देऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा तयारीत आहे.

अडीच महिन्यांपूर्वी शिवसेनेतील तब्बल चाळीस आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात मुख्यमंत्रीपद मिळविले. राज्यातील या सत्तापालटानंतर भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे गटाची राजकीय हवा निर्माण झाली.

त्यामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह राज्यात विविध जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते व नेत्यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. मात्र, नवी मुंबईतील नगरसेवकांच्या रूपाने राष्ट्रवादीतील नगरसेवक प्रथमच शिंदे गटात येत आहेत. त्यामुळे आता या माजी नगरसेवकांनी अजित पवारांची साथ सोडलं राष्ट्रवादीसाठी निश्चितच धक्कादायक असेल.

पहिल्या टप्प्यात सहा नगरसेवक आले असले तरी येत्या काही दिवसात आणखी नगरसेवक व पक्ष संघटनेतील पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीची ताकद हळू हळू कमी होणार की काय अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद होती. मात्र, नव्या मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यातच आता परत अर्धा डझन नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी आणखी क्षीण होणार हे नक्की