Eknath Shinde : दिल्लीमध्ये आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन महायुतीतील चालू वादांची सविस्तर माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाढत जाणारा तणाव, काही नेत्यांची भूमिका आणि पक्षांतर्गत मतभेद यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर शिंदेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मात्र राजकीय वर्तुळ अधिकच गोंधळात पडले. “मी रडणारा नाही, मी लढणारा”, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
याआधी शिंदे गटातील काही मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून आपली नाराजी सरकारसमोर व्यक्त केली होती. त्यानंतर काही मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन शिंदेंनी स्थानिक पातळीवरील अडचणींवर चर्चा केली होती. मात्र तिथेच न थांबता त्यांनी थेट दिल्लीगाठ घेत अमित शाहांना महायुतीतील वातावरण, विरोधकांची चाल आणि काही नेत्यांच्या वर्तनाबाबत मोठी तक्रार मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बैठकीत नेमकं काय बोललं गेलं?
दिल्लीतील भेटीत शिंदेंनी महायुतीत निर्माण होणाऱ्या तणावाचा थेट उल्लेख करत काही नेत्यांच्या कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गोंधळाची शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट केले. ऑपरेशन लोटसच्या चर्चेला हवा मिळावी असे काही प्रकार घडत आहेत, यामुळे आमचे पदाधिकारी गोंधळात पडत असल्याचा उल्लेखही त्यांनी शाहांपुढे केला. काही नेत्यांकडून जाणूनबुजून वातावरण बिघडवले जात असल्याचा मुद्दाही टेबलावर मांडला गेला.
शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं की, “राज्यातील छोटे वाद आम्ही दिल्लीपर्यंत नेत नाही; परंतु काही जणांच्या कृतीमुळे जनतेमध्ये चुकीचे चित्र तयार होत आहे.” त्यांच्या या शब्दांमुळे महायुतीतलं नाजूक वातावरण आणखी ठळक झालं.
शिंदेंचं स्पष्टीकरण
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदेंनी नेहमीप्रमाणे आपला ठाम पवित्रा कायम ठेवला. “बिहार विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी आलो होतो, तक्रारींचा पाढा वाचणारा नाही. मी रडणारा नाही, मी लढणारा आहे”, अशा शब्दांत त्यांनी बातम्यांतील चर्चांना झटका दिला. महायुतीमध्ये मतभेद नाहीत, प्रत्येक पक्षाने संयम राखणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात फडणवीस–अजित पवारांची तातडीची बैठक
शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर मुंबईतील राजकारणाची चाके जलदगतीने फिरायला लागली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी अचानक बैठक घेऊन शिंदे गटातील नाराजी कशी शांत करावी, यावर चर्चा केली. शिंदे गटातील नाराजी वाढली तर महायुतीवर परिणाम होऊ शकतो, अशा भीतीने ही चर्चा पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी “कुटुंबात थोडंफार होतंच” असं सांगत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला.






