महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच अनेक महत्वाचे निर्णयांची घोषणा केली आहे. आता त्यांनी आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयसुविधेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीनंतर कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केला.
या बैठकीत मुख्य सचिव आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची ही घोषणा दिलासादायक आहे.
दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण दिले. निमंत्रण देताना मंदिराच्या समितीच्या वतीकडून वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे वारी झाली नाही. त्यामुळे यावर्षी अधिक वारकरी या वर्षी पंढरपूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. खड्डा होऊन अपघात झाला नाही पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.