भारतावर इजिप्त प्रचंड खुश! आता आणखी १२ देशही करत आहेत तशाच मदतीची मागणी

सध्या गव्हाच्या निर्यातीवर बंदी असताना देखील भारताने इजिप्तमध्ये गव्हाची फार मोठी निर्यात केली आहे. इजिप्तने विनंती केल्यानंतर भारतातून तब्बल 61,500 टन गहू इजिप्तला पाठवण्यात आला. यानंतर आता इतर देशातून देखील गहूसाठी भारताला विनंती केली जात आहे.

भारताने नुकतीच इजिप्तमध्ये गव्हाची मोठी खेप पाठवली आहे. भारतातून 61,500 टन गहू इजिप्तला पाठवण्यात आला. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारताने कोणत्याही देशाला दिलेली ही सर्वात मोठी खेप आहे. आता इजिप्तप्रमाणेच जवळपास 12 देशांनी भारताला गहू निर्यात करण्याची विनंती केली असल्याचे समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती एका अधिकाऱ्याने गुप्त पद्धतीने दिली आहे. या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती करत याबद्दल सगळी माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, असे किमान डझनभर देश आहेत जे राजनैतिक पातळीवर भारताला गव्हाची निर्यात करण्याची विनंती सध्या करत आहेत.

तसेच तो म्हणाला, भारतातून निर्यातीवर बंदी लागू होण्यापूर्वीच, इजिप्तला पाठवल्या जाणार्‍या शिपमेंटसाठी क्रेडिट हमीसह अनिवार्य औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या होत्या. सीमाशुल्काने 17,160 टन गहू इजिप्तला निर्यात करण्यास परवानगी दिली.

माहितीनुसार, भारतातून इजिप्तमध्ये गव्हाची शिपमेंट मेरा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे केली जात आहे. बंदी लागू झाल्यानंतर या जहाजाला गव्हाच्या या खेपासाठी सीमाशुल्क मंजुरी देण्यात आली. ही खेप 17 मे रोजी गुजरातच्या कांडला बंदरातून निघाली होती.

संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून गव्हाच्या मागणीवर भारत विचार करेल. या देशांना अन्नधान्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकारी लवकरच चर्चा करणार आहेत. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाला गव्हासाठी कोणत्या देशांकडून विनंत्या येत आहेत हे अधिकाऱ्याने सांगितले नाही.