मागील दोन वर्षात जगभर कोरोनाचे संकट होते, त्यामुळे कोणतेही सण उत्सव साजरे करण्यावर बंदी होती. मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे सर्व सण अगदी जल्लोषात साजरे केले जातात. नुकताच राज्यात दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला.
दहीहंडीच्या वेळी डुप्लीकेट मुख्यमंत्र्याचा डान्स तुफान व्हायरल झाला होता. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. दाडी, गॉगल, फेटा मुख्यमंत्री घालतात असं सर्व काही या व्हिडीओतील डुप्लीकेट मुख्यमंत्र्याने घातले होते. त्याची प्रचंड चर्चा झाली.
सध्या पुण्यात सुद्धा एक तरुण मुख्यमंत्र्यांसारखा दिसत असल्याने त्याची चर्चा अधिक आहे. त्या तरूणाचं नाव विजयराजे माने असं आहे, त्याला सुद्धा गणपतीच्या काळात आरतीची अधिक आमंत्रणे येत असल्याने तो प्रचंड चर्चेत आला आहे.
विजयराजे माने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, त्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांचे डुप्लिकेट दिसत आहेत.
विजय माने यांना मुख्यमंत्र्यांसारखे हुबेहूब दिसण्याचा कधी फायदा, तर कधी तोटा होता. माने यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ते जिथे जातील तिथे अनेक तरुण हट्ट धरतात. एवढेच काय तर अनेक लोक प्रस्ताव आणि निवेदन घेऊन माने यांच्या घरी जातात.
आता गणेशोत्सवात तर मुख्यमंत्र्यांच्या या डुप्लिकेट असणाऱ्या विजय मानेंना पुण्यातील अनेक मंडळ आरतीसाठी बोलवत आहेत. माने रोज शहरभर फिरून सात ते आठ मंडळाच्या आरत्या पार पडतात. एवढेच नाही तर माने यांना अनेक उद्घाटनाला देखील बोलावलं जात आहे. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.