शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे.
मात्र, ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र बरेच दिवस होऊन देखील लटके यांचा राजीनामा पालिकेने स्वीकारला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पालिकेने ऋतुजा लटके यांचा अर्ज का स्वीकारला नाही, याबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे. लटके यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात एक अट घातली आहे, त्यामुळे राजीनामा स्वीकारला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ऋतुजा लटके यांनी राजीनामा पत्रात ‘जर मी निवडणूकीत पराभूत झाले, तर मला पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत घ्यावे’ अशी अट टाकली आहे. त्यामुळे लटके यांचा पालिकेने राजीनामा स्वीकारला नसल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, कुठल्याही राजीनाम्यात अशी अट असू शकत नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी पालिकेच्या प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर आता ऋतुजा लटके यांनी सुधारित अर्ज दिल्याचे सांगण्यात येत आहे.
लटके यांनी दिलेल्या सुधारित अर्जात कुठलीही अट नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, हा अर्ज मूळ राजीनाम्यात सुधारणा करणारा अर्ज आहे की नवा अर्ज याबाबतही आता पेच निर्माण होऊ शकतो. कारण जुन्या अर्जावरील तारखेनुसार नियमानुसार नोटिस कालावधी पूर्ण होत असल्याची माहिती मिळत आहे.