काल १५ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी, देशातील भ्रष्टाचार आणि राजकारणातील घराणेशाही यावर सडकून टीका केली. मोदी यांच्या या भाषणाचा संदर्भ देत आता विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले,देशात काही जण असे आहेत की ज्यांच्याकडे जगण्यासाठी पैसा नाही, तर काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्याकडे चोरीचा पैसा कुठे ठेवायचा, हा प्रश्न आहे, भष्ट्राचार देशाला वाळवीसारखा पोखरत आहे.
मोदी यांनी घराणेशाही वर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील सदस्यांचा उल्लेख करत फडणवीस राजीनामा देणार का, असा सवाल केला आहे.
रुपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, गंगाधरराव फडवणीस – मा.आमदार, शोभाताई फडवणीस – माजी मंत्री, देवेंद्र फडवणीस – उपमुख्यमंत्री, वाट पाहूया ? मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून व त्यांच्या पक्षातून सुरवात करण्याची,देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांच्या शब्दाचा मान राखत घराणेशाहीचा वारसा लाभलेले देवेंद्र फडवणीस राजीनामा देतील का? असे ट्विट त्यांनी केलं.
रुपाली पाटील यांनी केलेल्या या ट्विटला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार पाहावं लागेल. दरम्यान, मोदींनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी देखील उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी घराणेशाही वर आपलं मत व्यक्त करत मोदींच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला आहे.
अजित पवार म्हणाले,लोकशाही पद्धतीने भारतामध्ये सर्वांना निवडून येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जरी घराणेशाहीतला व्यक्ती असला तरी सुद्धा त्याची कुवत आणि क्षमता असेल, तो निवडून येत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही,असे अजित पवार म्हणाले.