Share

Shivsena : अंधेरीत पुन्हा नाट्य! ‘शिवसेना नेते मला धमकी देत आहेत’; उमेदवाराचे गंभीर आरोप, आयोग काय ॲक्शन घेणार?

सध्या राजकीय वर्तुळात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आता या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आता ऋतुजा लटके यांना अन्य काही अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने ही पोटनिवडणूक त्यांच्याविरोधात लढणं भाग आहे. मात्र, आता यातीलच एका अपक्ष उमेदवाराने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता, असा दावा अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर केला आहे. तसंच याबाबत मिलिंद कांबळे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे.

ऋतुजा लटके यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते, असा कांबळे यांचा दावा आहे. या पोटनिवडणुकीतील मतदानाला काही दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवाराने ऋतुजा लटके यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत तक्रार केल्याने आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी दिली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ही पोटनिवडणूक निष्पक्षपणे होण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या अंतर्गत जवळपास २ हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिस दल, राखीव पोलिस दल आणि अन्य सुरक्षा व्यवस्था देखील सुसज्ज व तैनात असणार आहे. अशी माहिती देखील निधी चौधरी यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now