Share

याचा वचपा घेऊ काळजी करू नका..; हल्ला झालेल्या शिवसैनिकाशी ठाकरेंचा संवाद

आज सकाळच्या सुमारास कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी तलवार आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन करून विचारपूस केली आहे.

हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. सकाळच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर, पालांडे यांनी शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

सध्या पालांडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमी पालांडे यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करत तब्येतीची चौकशी केली आहे, तसेच पालांडे यांना फोनवरून धीर दिला आहे. त्याचा वचपा घेवू, त्याची काळजी करू नका. आधी तुम्ही एकदम व्यवस्थित व्हा, मी येईन भेटायला, असे ठाकरे म्हणाले. त्यावर साहेब तुम्ही पाठीशी असल्यावर मी हल्लेखोरांना खाबरत नाही, असं पालांडे म्हणाले.

पालांडे यांनी हा हल्ला शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप केल्यानंतर, गायकवाड यांनी आरोपाचे खंडन केलं आहे. दरम्यान, पालांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि झालेल्या हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती दिली.

म्हणाले, नेहमीप्रमाणे कामाला जात होतो, तेव्हा अचानक हल्लेखोरांनी माझी गाडी अडवली. माझ्या वाहनाच्या दोन्ही बाजूने गाडी लावण्यात आली. त्यानंतर तलवार आणि रॉडने माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी थोडा पळालो. स्वतः ला वाचवत असताना मला हाताला आणि पायाला मार लागला.

हल्ला करणाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यांनी सांगितले. तसेच पुढे म्हणाले, महेश गायकवाडला पोलिसांचं संरक्षण आहे. त्यांचे समर्थक दहशत निर्माण करत आहे. दहशत निर्माण करून शिवसेनेवर दबाव निर्माण करत असाल, तर शिवसैनिक अशा दबावाला बळी पडणार नाही, असे पालांडे म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now