राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यपाल म्हणाले, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान अधिक आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
राज्यपाल यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपालांना इशारा दिला आहे. म्हणाले, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, ही पहिली वॉर्निंग आहे, गुण्यागोविंदाने राहा, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नका, असे देशपांडे म्हणाले आहेत.
देशपांडे म्हणाले, ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.
मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे.
त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, असं आमचं स्पष्ट मत आहे असे देशपांडे म्हणाले. तसेच म्हणाले, राज्यपाल म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाणेमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही.