खूप वर्षांपासून गोरेगावच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. त्याला अखेर आज यश मिळाले. गोरेगावच्या पत्राचाळीच्या विकास कामाचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासीयांना घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका, असं भावनिक आवाहन केलं आहे.
सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिममध्ये पत्रा चाळच्या 672 कुटुंबांच्या घरांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक लोक पोटापाण्यासाठी येतात आणि राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्याने ते विकून सोडून जाऊ नका. तुम्ही आजवर जो संघर्ष केला, तो कायम लक्षात ठेवा. हक्काचं घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका.
तसेच म्हणाले, अनेकांना माहित आहे गेल्या अनेक वर्ष त्याचं दळण दळलं जात होतं. पण प्रश्न सुटत नव्हता. अनेकांनी या चाळीच्या विकासासाठी आंदोलन केले. आजचा हा क्षण पाहायला अनेकजण हयातही नाही. गेल्यावर्षी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मला भेटायला आले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. त्यानंतर या प्रश्न मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पुढे म्हणाले, सुभाष देसाईंना मी धन्यवाद देतोय, त्यांनी या कामाचा अक्षरशः पिच्छा पुरवला होता. ज्या ज्या वेळेला कोणत्याही कामानिमित्त भेटायला यायचे, तेव्हा अहो ते पत्रावाला चाळीचं काय असे विचारायचे. कॅबिनेटमध्येही तोच विषय, असे एक एक जण याच्या पाठी लागले म्हणून आजचा दिवस उजाडला.
कामं अनेक असतात, अनेक योजना आहेत, अडचणीसुद्धा डोंगराएवढ्या असू शकतात. एकदा का विषय सोडवायचा म्हटल्यानंतर तो सोडवला जाऊ शकतो. मुंबईचं महत्त्व मी काही सांगायला नको. मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, ही सगळ्या मुंबईकरांची इच्छा आहे, असते आणि असायलाच पाहिजे. असे म्हणत कृपाकरून हे घर विकून मुंबई सोडून जाऊ नका. नाहीतर सगळा संघर्ष वाया जाईल असे म्हणाले.
उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आता महाविकास आघाडीने पत्राचाळवासीयांचा फार मोठा प्रश्न सोडवला आहे, यावर भाजपची काय प्रतिक्रिया असणार हे पाहावे लागेल.