shinde group : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते मंडळी देखील चांगलेच सक्रिय होताना पाहायला मिळतं आहे. शिंदे गट आणि भाजपच्या गोटात सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नेमकं कोणाच वारं असणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
तसेच महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघांमध्येही भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची करडी नजर आहे. यामुळेच आता राज्यातील राज्यातील भाजपच्या मंत्र्यांनाही दौरे करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहे.
पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आता शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये मात्र भाजपचे मंत्री जाणार नाहीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन सांगितलं आहे. बावनकुळे यांनी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना ७८ विधानसभा मतदारसंघांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १८ महिन्यांमध्ये या मंत्र्यांना ९ वेळा वाटून दिलेल्या मतदारसंघात पाठविण्याचे बावनकुळे यांनी निश्चित केले आहे. दौऱ्याच्या काळात मंत्री मतदारसंघात जावून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. याचबरोबर या मंत्र्यांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी आ. श्रीकांत भारतीय यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी हातमिळवणी करून भाजपसोबत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केलं आहे. यामुळे आता शिंदे गट आणि भाजप मिळून किमान १७५ जागांचे लक्ष्य गाठता येईल, अशी रणनीती भाजपने आखली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटातील काही स्थानिक भाजपमध्ये, तर भाजपातील स्थानिक नेते तेथील राजकीय परिस्थितीनुसार शिंदे गटात जात आहेत. मात्र, असे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होऊ द्यायचे नाही याबाबत दोन्ही पक्षांत एकमत झाल्याची माहिती आता समोर आली आहे.