Share

Hingoli : आम्ही काय बिहारमध्ये राहतो का? शेतकऱ्याने थेट रक्ताने पत्र लिहीत मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला संताप

हिंगोलीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून काही भागांचेच पंचनामे करण्यात आले, काही भाग वगळले गेले. यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एका शेतकऱ्याने तर रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव पतंगे नामक शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहून आम्ही बिहारमध्ये राहतो का..? असा संतप्त सवाल केला आहे. पत्रातून या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. सध्या या शेतकऱ्यांचे २००शब्दांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या शेतकऱ्याने पत्रात लिहिले, तालुक्यात खरीपाच्या पेरणी नंतर, अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना आलेल्या पुरानं पाणी शेतात जाऊन मोठं नुकसान झालं. बळीराजा देशोधडीला लागला असतांना नव्या सरकारनं पंचनामे केले नंतर मदत मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र, आपण काही भाग वगळले यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. साहेब आपण अधिवेशनादरम्यान म्हणाला होतात की, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मग हे काय आहे, आम्ही काय बिहारमध्ये राहतो का? असा संतप्त सवाल शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना केला.

तसेच लिहिले की, खाजगी फायनान्स कंपन्यांनी नाकी नौ आणलेत. आम्ही जगायचं कसं, सांगा? अन्यथा अंगात राहिलेल्या रक्तानं अभिषेक करून जिव सोडून देतो. अनुदान द्या. अशी मागणी शेतकऱ्यांनं मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात पाहावं लागेल.

दरम्यान, सध्या राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची दाणादाण उडाली आहे. पहिल्या टप्प्यातही मराठवाड्यात पाऊस झाला होता. त्यामुळे सरकारनं मदत जाहीर केली होती. परंतु अजूनही ती मदत अनेकांना मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now