काहीतरी चटकदार खाणं सर्वांनाच आवडत असतं. मात्र हे चटकदार पदार्थ कुठे आणि कोणत्या अवस्थेत बनवले जातात हे जाणून घेणं आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. आता एक अशी बातमी समोर येत आहे, जी वाचून तुम्ही चटकदार पदार्थ खाण्याअगोदर अनेकदा विचार केल्याशिवाय राहणार नाही.
चटकदार पदार्थ म्हणून समोसा खाणं सर्वांनाच आवडते. मात्र एका ठिकाणी विकला जाणार समोसा हा टॉयलेटमध्ये बनवला जातो, हे ऐकल्यावर तुम्हांला नक्कीच किळस येईल. होय, एका हॉटेलमध्ये विकला जाणार समोसा चक्क टॉयलेटमध्ये बनवला जात आहे. ही घटना सौदी अरेबिया मधील एका रेस्टॉरंटमध्ये उघड झाली आहे.
हे रेस्टॉरंट सौदीच्या जेद्दाह शहरात आहे. या रेस्टॉरंटमध्ये विकला जाणार समोसा रेस्टॉरंटमधील टॉयलेटमध्ये बनवला जात आहे. एक दोन महिने नाही तर तब्बल 30 वर्षांपासून समोसा बनवण्याचा हा प्रकार या रेस्टॉरंट मध्ये चालू आहे. ही माहिती समजताच स्थानिक प्रशासनाने आता हे रेस्टॉरंट बंद केलं आहे.
हे रेस्टॉरंट गेल्या 30 वर्षांपासून निवासी इमारतीत सुरू आहे. याची खबर जेद्दाह नगरपालिकेला मिळताच त्यांनी छापा टाकला. येथील एकाही कर्मचाऱ्यांकडे हेल्थ कार्ड नव्हते. येथील सर्व कारभार कायद्याच्या विरोधात चालू आहे. येथील नागरिकांनीही याकडे लक्ष दिले नव्हते.
जेद्दाहमधून प्रकाशित होणाऱ्या ओकाझ या अरबी वृत्तपत्रानुसार, रेस्टॉरंटमधील टॉयलेटमध्ये समोस्यासह उर्वरित स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ तयार केले जात होते. मांस, चिकन आणि चीज यांचा देखील वापर होत होता, मात्र यांपैकी बऱ्याच गोष्टी 2 वर्षांपूर्वी कालबाह्य झाल्या होत्या. रेस्टॉरंटमध्ये किडे आणि उंदीरही होते.
एकूणच रेस्टॉरंटची स्थिती ही अतिशय निकृष्ट दर्जाची होती. जेद्दाह नगरपालिकेने सांगितले की, त्यांनी अशी अनेक रेस्टॉरंट्स सील केली आहेत. अनेक कालबाह्य खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. जानेवारी महिन्यात जेद्दाहमध्ये शावरमा रेस्टॉरंटही बंद करण्यात आले होते. येथे ज्या ठिकाणी मांस शिजवले जात होते, तेथे उंदीर फिरत होते आणि अन्न चाखत होते. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला, त्यानंतर लोकांनी कारवाईची मागणी केली. नंतर रेस्टॉरंट बंद करण्यात आले.