थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी

राज्यात भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीसोबत एकत्र येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारलं. मात्र अडीच वर्षातच उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर पडावं लागलं. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला जबर धक्का बसला.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुन्हा शिवसेनेला उभारणी देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र ठाकरे पिता – पुत्र पिंजून काढत आहेत. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राजकीय वातावरण तापले आहे.

अशातच शिवसेनेला दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काही आमदारांनी  शिवसेना सोडली असली तरी शिवसेना आणखी मजबूत झाली असल्याचे या पंजाब आणि हिमाचल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबईत दाखल झाले आहे. त्यांनी भेट घेणार असून उद्धव ठाकरेंसोबत बैठक करणार असल्याच सांगितलं आहे. आम्ही हजारो शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फॉर्म देणार असल्याचे देखील शर्मा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबईत राहणारे पंजाबी आणि हिमाचल प्रदेशातील नागरीक शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूक नेमकं राजकीय समीकरण कसं बदलणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे राज्यातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political Crisis) सुप्रीम कोर्टातील (Supreme court) सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविले होते. या प्रकरणाची सुनावणी आज होणार होती. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती मिळत आहे.