Share

दिलदार दादा! जुन्या मित्राचा प्राण वाचवण्यासाठी अजित पवारांनी थेट अमेरिकेपर्यंत लावली फिल्डिंग

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात अनेक दिवसांपासून दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेतील एका इंजेक्शनची गरज होती. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष प्रयत्न करून ते उपलब्ध करून दिल्याने सध्या राजकारणात पवारांच्या आपुलकीची चर्चा होत आहे.

आमदार लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून दाखल आहेत. दाखल केले तेव्हा त्यांची तब्येत बरीच अत्यावस्थ होती. मात्र 3 दिवसांपूर्वी अमेरिकेतून मागविण्यात आलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे.

ते उपचाराला योग्य प्रतिसाद देवू लागले असून त्यांचे व्हेंटीलेटरही काढण्यात आले आहे. त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारे नवसंजीवनी ठरले आहे. हे इंजेक्शन त्यांना मिळवून देण्यात अजित पवार यांची मोठी मदत झाली असे बोलले जात आहे. अजित पवार हे लक्ष्मण जगताप यांचे जुने मित्र देखील आहेत.

आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शननंतर आमदार जगताप 20 तारखेपासून प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असले, तरी त्यांना बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यांनी अजित पवार यांचे मदत केल्यामुळे आभार मानले आहेत.

माहितीनुसार, गेल्या आठवड्यात अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना जगताप यांच्या प्रकृतीबद्दल समजले. त्यावेळी त्यांनी प्रस्तावित कार्यक्रम रद्द करून थेट रुग्णालय गाठले. जगताप यांच्या उपचारासाठी एका इंजेक्शनची गरज असल्याचं त्यांना समजले. मात्र, त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून तातडीने परवानगी घ्यावी लागणार असल्याचे अजित पवार यांना समजले.

त्यांनी तात्काळ सूत्र हालवून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांना संबंधित इंजेक्शन मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घेण्याची विनंती केली. राज्य सरकारकडून सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या मदतीने अमेरिकेतून संबंधित इंजेक्शन भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.

या इंजेक्शनच्या एका डोसनेच आमदार जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तूर्तास त्याची आणखी गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, या घटनेमुळे अजित पवार यांच्या आपुलकीच्या स्वभावाबद्दल राजकारणात चर्चा होत आहे, त्यांचे कौतुक केले जात आहे.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now