Share

‘शेर शिवराज’ संबंधित पोस्टमुळे संतापले अमोल कोल्हे; दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

Digpal Lanjekar

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिखस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता ‘शेर शिवराज’ हा त्यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील चौथे पुष्प आहे. या चित्रपटाचे आणि यामधील कलाकरांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, यादरम्यान या चित्रपटासंबंधित एका पोस्टमुळे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि दिग्पाल लांजेकर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

‘शेर शिवराज’ या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर चिन्मयच्या अभिनयाचे कौतुक करत एका चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांना टॅग करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये चाहत्याने असे लिहिले होते की, ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभुराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा’.

त्यानंतर ही पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या फेसबुकवर हँडलवर शेअर केली. यासोबत त्यांनी हात जोडल्याचे इमोजीसुद्धा पोस्ट केले होते. तर ही पोस्ट अमोल कोल्हेंच्या निदर्शनास आली आणि त्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली ही नाराजी व्यक्त केली. अमोल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर आणि ‘अमोल ते अनमोल’ या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर केला.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही, उलट कौतुकच केले. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!’

अमोल कोल्हेंच्या या पोस्टनंतर दिग्पाल लांजेकर यांनीही ‘मनापासून दिलगिरी, क्षमस्व’ म्हणत अमोल कोल्हेंची माफी मागितली. त्यांनी इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर करत म्हटले की, ‘आताच माननीय खासदार अमोल कोल्हे यांची पोस्ट माझ्याकडून बघण्यात आली. माझ्या फेसबुक वॉलवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टबाबत ते बोलत होते’.

‘अनेक चाहते ‘शेर शिवराज’ चित्रपटानंतर भराभरा पोस्ट शेअर करत होते. त्यात अनावधानाने पहिल्या काही ओळी वाचून माझ्या टीमतर्फे ती पोस्ट शेअर करण्यात आली. पण नंतर खाली काही म्हटलं गेल्यावर ती लगेचच हटवण्यात आली. दुर्दैवाने त्या पोस्टचा स्क्रिनशॉट कोणी काढला असेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला असेल’.

‘तर मी या समाजमाध्यमातून सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलावंतांबद्धल माझ्या मनात कधीही आकस नाही आणि नसेल. कुठल्याही प्रकारे त्यांचा असा अनादर करण्याचा माझी मनस्वी भूमिका नसेल. या समाजमाध्यमातून मी त्यांची मनापासून माफी मागतो’.

महत्त्वाच्या बातम्या :
‘धुमधडाका’, ‘दे दणादण’ चित्रपटातील लक्ष्याच्या हिरोईनचे निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकरांची महाघोषणा; घेऊन येताहेत बिगबजेट चित्रपट ‘वीर दौडले सात’
टॉपलेस होऊन गार्डनमध्ये फिरताना दिसली उर्फी जावेद, अचानक पलटली अन्…; हैराण करणारा व्हिडिओ आला समोर

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now