एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना याचा मोठा धक्का बसला. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला फार मोठी गळती लागली.
शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढत आता उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल त्यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाराचाराचे आरोप करत आहात त्यांना तुम्ही क्लिन चीट देत आहात. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला?’ असा सवाल त्यांनी मोदींना केला.
त्यांनी मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील टोला लगावला. मध्यंतरी अमित शहा यांनी मुंबई दौरा केला, यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. म्हणाले, मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत. लचके तोडणारी अवलाद आहे ती गिधाडांची. ती गिधाडं फिरू लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयची आहे, मुंबई गिळायची आहे.
तसेच म्हणाले, कोरोनामध्ये मला माझ्या जनतेचे प्राण प्रिय होते. उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी जे घडलं ते महाराष्ट्रात झालं नाही. कोर्टानं आपलं कौतूक केलं. मुंबई ज्याप्रकारे सांभाळली त्याचं कौतूक कमळाबाईला नाही तर परदेशातील लोकांना आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझं आव्हान आहे की, संपूर्ण देशात महाराष्ट्रात जे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले ते कुणीही केले नाही. कोरोनाच्या परिस्थितीत जे काम केले ते कौतूकास्पद होते. कोरोनाला केंद्राची अनास्था जबाबदार असल्याचा एक अहवाल देखील समोर आला आहे, असे ठाकरे म्हणाले.