राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आता मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी दुफळी माजली आहे. माजी गृहमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनीच बंड केले आहे.
या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी स्वतंत्र पॅनल स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी आणखी वाढवली आहे.
देवदत्त निकम हे आंबेगाव तालुका आणि शिरूर लोकसभेतील मोठे नेते आहेत. ते यापुर्वी भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन होते. त्यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली आहे. ते मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देखील होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशाविरोधात बंड केले. त्यामुळे देवदत्त निकम यांना पक्षातून काढून टाकण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीतील पडलेली दुफळी दूर करू शकतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकहाती सत्तेत असलेले माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी बंडखोरी केल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तिरंगी लढत होणार आहे. याचा परिणाम महाविकास आघाडीवर तसेच निवडणूक निकालावर होऊ शकतो.
तर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि शिंदे गट शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. बंडखोरी केली तरी देवदत्त निकम यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे मोठे वक्तव्य केले होते. काही आमदार अजित पवारांसह राष़्ट्रलादी सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर प्रश्न विचारला असता मंत्री दादा भुसे यांनी हे वक्तव्य केले.
संजय राऊत यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. ‘सामन’ वृत्तपत्रातील रोखठोकच्या विशेषांकात संजय राऊत यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.
‘भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, कोणाला वैयक्तिक निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली.
आता अजितदादांनी वेगळी चूल मांडली तर दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत जाणार का? ते गेले तर देवदत्त निकम शरद पवारांच्या गोटात राहणार? याच्या उलट होऊन देवदत्त निकम अजित पवारांसोबत जाणार आणि वळसे पाटील मात्र शरद पवारांसोबत राहणार अशा शक्यता व्यक्त होत आहेत.
तसेच कुणी कुठेही राहीले तरी २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकणार अशाही चर्चा सुरू आहेत. अजित पवार – शरद पवार वादाचाच हा एक अंक आहे असेही बोलले जात आहे.