शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर वाढदिवसाच्या दिवशी देखील टीका करणं सोडलं नाही.
रावसाहेब दानवे यांनी आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असून देखील त्यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’ तील मुलाखतीवरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यांनी ठाकरेंच्या विविध मुद्यांवरून निशाणा साधला आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना इतरांवर आरोप करायचे असतील तर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊन किंवा लोकांमध्ये जाऊन बोलावे. बंद खोलीत संजय राऊत यांना मुलाखती देऊन त्यांनी बेछूट आरोप करू नयेत, असे दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरे बंद खोलीत मुलाखती देऊन बेछूट आरोप करतात. त्यांनी भाजपवर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. संजय राऊत प्रश्न विचारतात आणि उद्धव ठाकरे त्यावर उत्तर देतात. मुलाखत घ्यायचीच असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची घ्यावी. त्यांचीही बाजू ऐकली जावी, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तील मुलाखतीत उद्या एकनाथ शिंदे पंतप्रधान होण्याची मागणी करतील, असे म्हटले होते. यावरही दानवे यांनी प्रत्युत्तर दिले म्हणाले, उद्धव ठाकरे निराश झाले आहेत. ते आज काय बोलतात, हे उद्या त्यांच्या लक्षात राहत नाही.
तसेच म्हणाले, त्यांचाच डोळा पंतप्रधान पदावर असेल. उद्धव ठाकरे का बोलतात, यावर आमचा पक्ष चालत नाही. आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये. निर्णय घेण्यासाठी आणि धोरण ठरवण्यासाठी आमचं नेतृत्त्व सक्षम आहे, असे दानवे म्हणाले.
मी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असं आश्वासन दिलं आणि ते पाळलं, असे उद्धव ठाकरे सांगतात. पण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना, ‘मी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवेन’, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी का पाळले नाही, असे दानवे म्हणाले.